क्राईम

ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत गावठी पिस्टलसह दोघांवर कारवाई; २७ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड | प्रतिनिधी – जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका आरोपीच्या ताब्यातून गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

दि. २५ मे २०२६ रोजी पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एनबीएस कॉलेज परिसरातील बंदाघाट रोड येथे एक व्यक्ती गावठी पिस्टल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून छापा टाकला. यावेळी हरप्रितसिंघ ऊर्फ हॅप्पी महेंद्रसिंघ सुनकेवार (वय ४१, रा. पांचाली हॉटेलजवळ, गुरुद्वारा चौक, नांदेड) यास ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान त्याच्या ताब्यातून विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगण्यात आलेले एक लोखंडी गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, सदर अग्नीशस्त्र व काडतुसे तेजिंदरपालसिंघ ऊर्फ सोनू भागसिंघ लदड (वय २८, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, मालेगाव रोड, नांदेड) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती समोर आली.

यानंतर पोलिसांनी तेजिंदरपालसिंघ लदड यालाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना मुद्देमालासह वजीराबाद पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *