जिला

इंधन दरवाढ व तुटवड्याविरोधात काँग्रेसचा अनोखा एल्गार

बैलगाडीत दुचाकी टाकून पेट्रोल पंपावर मोर्चा; महिलांकडून रस्त्यावर प्रतिकात्मक चुलीवर स्वयंपाक करत निषेध

 

नांदेड, प्रतिनिधी : वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि शहरातील इंधन तुटवड्याच्या समस्येविरोधात नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी शहरात अनोख्या पद्धतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. महात्मा फुले पुतळ्यासमोर सुरू झालेल्या या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि वाहनधारकांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.

आंदोलनाची सुरुवात महात्मा फुले पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. यानंतर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि इंधन तुटवड्यामुळे नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टांचे प्रतीक म्हणून कार्यकर्त्यांनी बंद पडलेली दुचाकी थेट बैलगाडीत ठेवून पेट्रोल पंपाकडे मोर्चा काढला. इंधन उपलब्ध नसल्यास पुन्हा बैलगाडीच्या काळाकडे जाण्याची वेळ येईल, असा संदेश आंदोलनातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महिलांनीही आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेत भर रस्त्यात प्रतिकात्मक चुलीवर स्वयंपाक बनवत गॅस टंचाई आणि वाढत्या घरगुती खर्चाचा निषेध केला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडत असून, स्वयंपाक गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

महात्मा फुले पुतळा ते शहरातील पेट्रोल पंप असा मोर्चा काढण्यात आला. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान ‘मेलोडी’ चॉकलेटचे वाटप करून भाजप सरकारवर उपरोधिक टीका करण्यात आली. “महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा,” अशी मागणी आंदोलकांनी केली.

इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, शहरातील पेट्रोल-डिझेलचा तुटवडा दूर करून नियमित पुरवठा सुरू करावा, तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *