पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेडमध्ये तक्रारदारांशी साधला ‘जनसंवाद’

नांदेड, दि. ३० (प्रतिनिधी) – नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचा जलद निपटारा करणे तसेच पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढवून लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना थेट पोलीस उपमहानिरीक्षकांसमोर आपल्या समस्या मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक दरमहा जिल्हा मुख्यालयांना भेट देत असून, त्यावेळी संबंधित जिल्ह्यातील तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यावर भर दिला जात आहे. चालू महिन्यात लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्येही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या उपक्रमास प्रतिसाद देत आपल्या तक्रारी मांडल्या होत्या.
शुक्रवारी (दि. ३०) पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे जिल्हा पोलीस कामकाजाचा मासिक आढावा घेतल्यानंतर दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत जिल्ह्यातील तक्रारदारांशी ‘जनसंवाद’ साधला. यावेळी एकूण ३७ तक्रारदारांनी आपल्या लेखी तक्रारी सादर केल्या. यामध्ये मालमत्ता विषयक वाद, हरवलेल्या व्यक्ती, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसाय आदी तक्रारींचा समावेश होता. तसेच उपस्थित नागरिकांनी पोलीस कामकाजाबाबत विविध अपेक्षाही व्यक्त केल्या.
प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
तक्रारदारांकडून प्राप्त अर्जांच्या त्वरित निवारणासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयामार्फत यापूर्वीच ‘संवेदना’ ही तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ‘जनसंवाद’ उपक्रमादरम्यान प्राप्त सर्व अर्ज ‘संवेदना’ पोर्टलमार्फत पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार असून, प्रत्येक तक्रारीवरील कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेतला जाणार आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.



