नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थांविरोधात धडक मोहीम; आठवडाभरात 30 गुन्हे, 67 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. 8 : नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली असून, पहिल्याच आठवड्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 1 ते 30 जून 2026 या कालावधीत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत 1 ते 7 जून 2026 या पहिल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत एकूण 2,702 पानटपऱ्या व दुकानांची झाडाझडती घेण्यात आली. गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123 अंतर्गत एकूण 30 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 48 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 67 लाख 2 हजार 671 रुपयांचा गुटखा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
जिल्हानिहाय कारवाई अशी :
नांदेड जिल्ह्यात 530 पानटपऱ्यांची तपासणी करून 11 गुन्हे दाखल करण्यात आले. यात 12 आरोपींकडून 25 लाख 21 हजार 741 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परभणी जिल्ह्यात 839 पानटपऱ्यांची तपासणी करत 9 गुन्हे दाखल झाले असून, 14 आरोपींकडून 12 लाख 64 हजार 43 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात 724 ठिकाणी तपासणीदरम्यान 3 गुन्हे दाखल करत 4 आरोपींकडून 1 लाख 69 हजार 531 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर लातूर जिल्ह्यात 609 पानटपऱ्यांची तपासणी करून 7 गुन्ह्यांमध्ये 18 आरोपींकडून 27 लाख 47 हजार 356 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी पानटपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली असून, अंमली पदार्थांच्या साठवणुकीची संभाव्य ठिकाणेही तपासली जात आहेत.
दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. 91 50 100 100 या मोबाईल क्रमांकावर नागरिक फोन अथवा व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे गुटखा, अंमली पदार्थ व इतर अवैध व्यवसायांची माहिती देऊ शकतात.
आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांविरोधात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.



