उन्हाळी सुट्टीनंतर शाळेची आनंददायी सुरुवात; पोलीस कॉलनी शाळेतील पूर्वतयारी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड, दि. 15 जून : उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोलीस कॉलनी स्नेहनगर, नांदेड येथे सोमवार (दि. 15 जून) रोजी शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नांदेड श्री. अबिनाश कुमार, पोलीस उपअधीक्षक कंधार तथा गृह शिक्षणाधिकारी डॉ. अश्विनी जगताप आणि शिक्षणाधिकारी श्री. दिलीप बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता व विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा पूर्वतयारी उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. लहान मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून आनंददायी व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण तयार करण्यासाठी अशा मेळाव्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, कृतीआधारित शिक्षण, आकर्षक शैक्षणिक खेळ, गाणी, चित्रकला तसेच विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पालकांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
या मेळाव्यास शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापक श्री. मिथुन यादव आणि सौ. स्वप्ना मिनके यांनी उत्कृष्टरीत्या केले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक मंडलवार, पोलीस कल्याण विभाग नांदेडचे उमाकांत दामेकर (कॉलनी इन्चार्ज) तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.



