SBI डॉक्टर लेन शाखेतील ₹85.81 लाखांच्या सोने घोटाळ्यातील मुख्य आरोपीचा मृत्यू

नांदेड : नांदेड येथील एसबीआयच्या डॉक्टर लेन शाखेतील तब्बल 85.81 लाखांच्या सोने घोटाळ्याप्रकरणातील मुख्य आरोपी आदित्य प्रकाश सेनगावकर (वय 40) याचा राजस्थानमधील भरतपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे घोटाळ्याच्या तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्यातील सुमारे 391.60 ग्रॅम अस्सल सोने काढून त्याजागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. बँकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणादरम्यान हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या घोटाळ्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली.
या प्रकरणात सेवा व्यवस्थापक जीवन जगदाळे यांच्यासह चार आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून काही प्रमाणात सोनेही जप्त करण्यात आले आहे. मात्र, घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या आदित्य सेनगावकर यांच्या मृत्यूमुळे उर्वरित सोन्याचा मागोवा घेणे तसेच इतर संशयितांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या घटनेला नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दुजोरा दिला आहे.



