क्राईम

ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत आरपीएफ नांदेडची प्रभावी कारवाई; प्रवाशांचे हरवलेले साहित्य परत मिळवून दिले, तीन संशयित चोरट्यांवर कारवाई

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल (RPF), नांदेड विभागाने 28 / 29 जून 2026 रोजी तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले. एका प्रवाशाचे मौल्यवान साहित्य सुरक्षितपणे परत मिळवून देण्यात आले तसेच प्रवाशांच्या सामान चोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन संशयितांना पकडून पुढील कारवाईसाठी जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथे सीआरपीएफ जवानाचे साहित्य सुरक्षित परत
दि. 28 जून रोजी दुपारी सुमारे 12.45 वाजता हजूर साहिब नांदेड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रेल्वे एस्कॉर्ट ड्युटीवर असलेल्या महिला कॉन्स्टेबल कु. अभिलाषा व चार आरपीएसएफ जवानांनी मुकुंदवाडी व छत्रपती संभाजीनगर स्थानकादरम्यान डी-9 डब्यात एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले.

चौकशीत त्याची ओळख अझहर पठाण अशी पटली. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये सीआरपीएफ जवानाची कँटीन कार्ड, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ओळखपत्रे, कौटुंबिक मेडिकल कार्ड, मतदार ओळखपत्र, मूव्हमेंट ऑर्डर, रजिस्टर तसेच अंदाजे ₹12,000 किमतीचा रिअलमी मोबाईल आढळून आला.

सदर साहित्याचा मालक घटनास्थळी मिळून न आल्याने संशयितास साहित्यांसह लोहमार्ग पोलीस, छत्रपती संभाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर संबंधित सीआरपीएफ जवान लोहमार्ग पोलीस कार्यालयात हजर झाल्यानंतर आवश्यक पडताळणी करून त्याचे सर्व साहित्य सुरक्षितपणे त्याच्या ताब्यात देण्यात आले.

हजूर साहिब नांदेड येथे दोन संशयित प्रवासी सामान चोरट्यांना अटक
याच दिवशी सायंकाळी रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे गुप्तवार्ता शाखेने (CIB) लोहमार्ग पोलीस च्या समन्वयाने हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर विशेष गस्त घातली.

सायंकाळी सुमारे 07.00 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी असलेल्या 17058 देवगिरी एक्सप्रेसच्या जनरल डब्याजवळ प्रवाशांचे सामान चोरण्याच्या प्रयत्नात असलेला संशयित जीवन शंकपाळ यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध जीआरपी, नांदेड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS)-2023 च्या कलम 128 अंतर्गत अध्याय गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
त्यानंतर सायंकाळी सुमारे 07.30 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 02 वरील एस्केलेटरजवळ प्रवाशांचे सामान चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रकाश गायकवाड यासही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध जीआरपी, नांदेड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 110 व 117 अंतर्गत अध्याय गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

रेल्वे सुरक्षा बल, नांदेड विभाग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ प्रभावीपणे राबवत असून रेल्वे परिसरातील संशयित व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत. प्रवाशांनी कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा घटना आढळल्यास त्वरित रेल्वे सुरक्षा बल किंवा रेल्वे हेल्पलाईन 139 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *