एसआयआरला मुदतवाढ; आता ८ ऑगस्टपर्यंत घरभेटी व मतदार पडताळणी

नांदेड | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. राज्यातील काही भागांत, विशेषतः कोकण आणि मुंबई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मतदार पडताळणीच्या कामात अडथळे निर्माण झाल्याने राज्य निवडणूक कार्यालयाने मुदतवाढीची मागणी केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत सुधारित वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार, मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेट देऊन मतदार पडताळणीचे काम आता ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याच कालावधीत मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना देखील केली जाणार आहे.
यानंतर १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या यादीवर नागरिकांना हरकती व दावे दाखल करण्यासाठी १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ असा कालावधी देण्यात आला आहे. प्राप्त हरकती आणि दाव्यांची छाननी करून त्यांचा निपटारा १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत केला जाईल.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. परिहर यांनी सुधारित वेळापत्रकाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे तसेच स्थानिक स्तरावरील सर्व राजकीय पक्षांना हे वेळापत्रक लेखी स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.



