मराठवाडा

वाचन संस्कृतीमुळेच युवकांची जडणघडण सक्षम होते- सुजात आंबेडकर

नांदेड,११- नवी पिढी विविध क्षेत्रांत सक्षमपणे पुढे जात असली तरी तिच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनाची सवय जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञान, विचार आणि सामाजिक जाण समृद्ध करण्यासाठी पुस्तकांचे वाचन महत्त्वाची भूमिका बजावते, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजातदादा आंबेडकर यांनी केले.

नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद परिसरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव-२०२६ निमित्त आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, मयूर आंदेलवाड, अमित राठोड, समाजकल्याण अधिकारी राजू एडके, नगरसेवक प्रशांत इंगोले, रणजीत गजभारे, राजेश जोंधळे, धनंजय गुम्मलवार, विजय वाघमारे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. उच्च शिक्षणासोबतच सातत्यपूर्ण वाचनाची सवय प्रत्येकाने जोपासली पाहिजे. समाजाला प्रगल्भ दिशा देण्यासाठी आणि वैचारिक समृद्धी वाढविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रसार आवश्यक असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका मीरा भालेराव (मुंबई) तसेच रोहित उन्हवणे, प्रदीप डोणे आणि विवेक जगताप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करणारी बहारदार भीमगीते सादर केली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महापुरुषांचा वारसा पुढे नेणे आवश्यक- सीईओ महेश पाटील

समाजसुधारणेसाठी संत, समाजसुधारक आणि महापुरुषांनी केलेले कार्य आजही दिशादर्शक आहे. समाजाच्या गरजा ओळखून त्यांनी दूरदृष्टीने कार्य केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कार्यातून योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी केले.
प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आपली सेवा बजावताना महापुरुषांचे विचार आचरणात आणून त्याच भावनेतून काम करावे. समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून प्रामाणिकपणे कार्य केल्यास महापुरुषांच्या विचारांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *