नांदेडचे पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांना ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कार
१२ जुलैला मुंबईत होणार सन्मान; यापूर्वीही विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी झाला गौरव

नांदेड : पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘टाईम्स न्यूज २४’ या वृत्तपोर्टलचे संपादक तथा पत्रकार किशोरकुमार शिवाजीराव वागदरीकर यांची ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ यांच्या वतीने आयोजित पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा–२०२६’ मध्ये त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
पत्रकारितेत निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने प्रभावी वृत्तांकन केल्याबद्दल वागदरीकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डिजिटल माध्यमातून सामाजिक, प्रशासकीय आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत त्यांनी पत्रकारितेत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
वागदरीकर यांनी आपल्या पत्रकारिता कारकिर्दीत दै. सकाळ, दै. भास्कर, दै. देशोन्नती तसेच दै. लोकमंच क्रांती या वृत्तपत्रांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत काम केले आहे. सध्या ते ‘टाईम्स न्यूज २४’ या वेब पोर्टल व युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून निर्भीड, विश्वासार्ह आणि जनहिताच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवत असून, डिजिटल पत्रकारितेत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.



