महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या परभणी जिल्हाप्रमुखपदी पैलवान संतोष उर्फ अमोल सोनाजी मोरे यांची निवड

परभणी : परभणी जिल्ह्यातील युवा कुस्तीप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते पैलवान संतोष उर्फ अमोल सोनाजी मोरे यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या परभणी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पैलवान संग्राम कांबळे यांनी नुकतीच ही घोषणा केली.
मोरे यांच्या निवडीचे जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रासह विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
पैलवान संतोष उर्फ अमोल मोरे हे गेल्या १० ते १५ वर्षांपासून जगदंब कुस्ती संघटनेच्या माध्यमातून श्रीक्षेत्र त्रिधारा येथे दरवर्षी भव्य निकाली कुस्ती मैदानाचे यशस्वी आयोजन करत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे परभणी जिल्ह्यातील कुस्तीला चालना मिळाली असून अनेक होतकरू मल्लांना आपले कौशल्य दाखविण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
कुस्ती क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. जगदंब प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी परभणीत जगदंब कुस्ती संकुल उभारण्याचा संकल्प साकारला असून, जिल्ह्यातील कुस्ती परंपरेला नवी दिशा देण्याचे काम सुरू केले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी जंगी निकाली कुस्त्यांचे आयोजन, विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, रक्तदान शिबिरे तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. याशिवाय होतकरू पैलवानांना खुराकासाठी मानधन व आर्थिक मदत करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही ते सातत्याने करत आहेत.
परभणी जिल्ह्यात अधिकाधिक गुणवंत पैलवान घडावेत, कुस्तीची परंपरा अधिक समृद्ध व्हावी आणि नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पैलवान मोरे सातत्याने प्रयत्नशील आहेत.
त्यांच्या या नियुक्तीमुळे परभणी जिल्ह्यात कुस्तीच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास जिल्ह्यातील कुस्तीपटू, क्रीडाप्रेमी व विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केला असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



