परभणीत जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा मारहाण; नानलपेठ हद्दीतील जुन्या वादाने घेतले हिंसक वळण
साक्षी न देण्याच्या वादातून नवीन हॉटेल चा काम सुरू असताना जुना मोंढा परिसरात हल्ला; युवक गंभीर जखमी, आर.पी. मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू

परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीतील जुना मोंढा परिसरात जुन्या वादातून एका युवकावर पुन्हा मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यापूर्वीही याच वादातून संबंधित युवकाला मारहाण झाली होती. न्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा हल्ला झाल्याचा आरोप जखमीच्या कुटुंबीयांनी केला आहे. घटनेत युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर परभणीतील आर.पी. मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना मोंढा परिसरात मंगळवारी दुपारी जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत मदनी हॉटेलचे मालक खामिसा मोहम्मद सलमान गंभीर जखमी झाला. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने आर.पी. मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी सलमान हा एका गुन्ह्यात साक्षीदार असून संबंधित प्रकरणात साक्ष देऊ नये, असा दबाव त्याच्यावर यापूर्वी टाकण्यात आला होता. त्यास विरोध केल्यामुळे सुमारे दीड महिन्यापूर्वीही त्याच्यावर मारहाण झाली होती. त्या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी दाखल झाल्या असून तपास अद्याप सुरू आहे.
दरम्यान, संबंधित आरोपीला न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला होता. जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा मंगळवारी दुपारी जुना मोंढा परिसरातील मदनी हॉटेल च्या नवीन बांधकामावर उमर हाजी इस्माईल जिया व त्याच्यासोबत आलेल्या आणखी दोघांनी सलमानशी शाब्दिक वाद घातल्याचा आरोप आहे. हा वाद काही वेळातच हाणामारीत बदलला. या घटनेत सलमानच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच नानलपेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तसेच आर.पी. मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन जखमीची विचारपूस केली. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणाची एन.सी. नोंद करण्यात आली होती. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी जखमी व त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे जुना मोंढा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



