ईद-ए-मिलादुन्नबी शांततेत साजरी करावी : पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण
मुदखेड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक; डीजेमुक्त उत्सवाचे आवाहन

मुदखेड तालुका प्रतिनिधी पत्रकार मोहम्मद हकीम
मुदखेड : मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-ए-मिलादुन्नबीचा सण येत्या २६ ऑगस्ट रोजी देशभरात साजरा करण्यात येणार आहे. त्याच दिवशी मुदखेड शहरातही ईद-ए-मिलादुन्नबी साजरी करण्याचा निर्णय ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीच्या वतीने घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुदखेड पोलीस ठाण्यात रविवारी (दि. २३ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मार्गदर्शन करताना मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव शांतता, संयम आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करण्याचे आवाहन केले. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनातील करुणा, शांतता, बंधुभाव आणि माणुसकीचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, हा या पवित्र दिवसाचा संदेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. उत्सव डीजेमुक्त आणि शांततेच्या वातावरणात साजरा करून सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी केले. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीस नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष करीम खान, नगरसेवक प्रतिनिधी अब्दुल सलाम सर, इस्लामपुरा ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीचे अध्यक्ष सय्यद इरफान सय्यद महेबूब, मोहम्मद जमील मोहम्मद मधार, बबलू जनिमिया, पत्रकार अतीख अहेमद, पत्रकार मोहम्मद हकीम आदी उपस्थित होते.
बैठकीच्या आयोजनासाठी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सण शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.



