जिला

 

 

संसार मधून सामाजिक वास्तव, कौटुंबिक जिव्हाळा व प्रेमभावनेचे संवेदनशील दर्शन- प्रतिमा इंगोले

 

*डॉ. राम वाघमारे यांच्या साहित्यिक वाटचालीचे कौतुक; पुण्यात संसार कवितासंग्रहाचे प्रकाशन*

 

नांदेड, १०- सामाजिक वास्तव, कौटुंबिक नात्यांतील जिव्हाळा व प्रेमभावनेचे विविध पदर अत्यंत संवेदनशीलतेने शब्दबद्ध करणारा डॉ. राम वाघमारे यांचा संसार हा कवितासंग्रह असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रतिमा इंगोले यांनी केले. पुणे येथील बालभारतीमध्ये दिनांक ९ सप्टेंबर प्रसिद्ध साहित्यिक प्रतिमा इंगोले व एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते संसार कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रतिमा इंगोले यांनी डॉ. राम वाघमारे यांच्या साहित्यिक प्रवासाचा गौरव केला. त्या म्हणाल्या, डॉ वाघमारे यांच्या संसार मधील कविता कौटुंबिक व सामाजिक आशयाच्या असून काही कवितांमधून प्रेमभावनेचेही प्रभावी चित्रण झाले आहे. अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या या कवितांचा आशय आजही अस्सल, ताजा आणि वास्तववादी वाटतो, ही त्यांच्या लेखनाची ताकद असल्याचे इंगोले यांनी नमूद केले.

कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र, समीक्षा आदी विविध साहित्यप्रकारांत लेखन केल्यानंतर डॉ. वाघमारे यांनी काव्यप्रांतातही दमदारपणे प्रवेश केला आहे. कविता ही विजेसारखी असते, तिला शब्दांत पकडून ठेवणे अवघड असते. मात्र, डॉ. राम वाघमारे यांनी अनुभवविश्वातून कवितेला दिलेली शब्दरूप अभिव्यक्ती स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. संसारच्या प्रकाशनासाठी इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे यांच्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.

बालभारतीच्या मराठी विभागाच्या सहाय्यक विशेषाधिकारी सविता वायाळ म्हणाल्या, गेल्या वर्षभरापासून डॉ. राम वाघमारे आमच्या सानिध्यात आहेत. मात्र, आपण लेखक आहोत किंवा आपली एवढी पुस्तके प्रकाशित झाली आहेत, असा उल्लेख त्यांनी कधीही केला नाही. नुकतेच त्यांनी आपली प्रकाशित झालेली अनेक पुस्तके आणून दिली. ती पाहून आश्चर्याबरोबरच आनंदही झाला. अतिशय नम्र असलेल्या डॉ. राम वाघमारे यांच्या भावी साहित्यिक वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास बालभारतीच्या मराठी विभागाचे सहाय्यक विशेषाधिकारी अशोक तकटे यांचीही मंचावर उपस्थिती होती. साहित्यिक सुनील गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर अतुल गंजीवाले यांनी आभार मानले. रोहिदास बागड व श्रीकांत देशपांडे हे कार्यक्रमाचे संयोजक होते. कार्यक्रमास प्रांजली जोशी, साधना पोहरे, सुषमा मानेकर, सुवर्णा भोसले, अन्वया काने, वैदयी तारे, श्रीकांत देशपांडे, सुषमा मारेगावकर, रोहिदास बागड, सुनील गायकवाड, अतुल गंजीवाले, डॉ. किशोरी जोशी यांच्यासह पुणे, मुंबई, नागपूर, गडचिरोली, सातारा, रत्नागिरी, नांदेड, अमरावती, पनवेल, यवतमाळ, जळगाव, बीड, हिंगोली आदी जिल्ह्यांतील बालभारती मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नांदेड येथील इसाप प्रकाशनाने संसार हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. डॉ. राम वाघमारे यांच्या थोडेसे भारताबाहेर या प्रवासवर्णनाचे नुकतेच नांदेड येथे प्रकाशन झाले होते. त्यानंतर संसारचे पुणे येथे प्रकाशन झाल्याने त्यांच्या साहित्यिक प्रवासातील आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याची नोंद झाली आहे.

 

डॉ. राम वाघमारे यांचा साहित्यप्रवास अभिनंदनीय- एकनाथ आव्हाड

प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ आव्हाड म्हणाले, डॉ. राम वाघमारे यांचा साहित्यप्रवास अभिनंदनीय आहे. विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करताना त्यांनी स्वतःचे अनुभव व सामाजिक वास्तव यांना प्रभावी अभिव्यक्ती दिली आहे. साहित्याच्या विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत राहणे ही त्यांच्या लेखननिष्ठेची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *