जिला

मानवी साखळीतून ‘विनोबा’ नाव साकारत आचार्य विनोबा भावे यांना अनोखे अभिवादन

 

मारतळा, दि. ११ सप्टेंबर २०२६ :

भूदान चळवळीचे प्रणेते, समाजसुधारक व विचारवंत आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मारतळा येथे विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून ‘विनोबा’ हे नाव साकारून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

 

आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शिस्तबद्ध मानवी साखळी तयार केली. या मानवी साखळीतून साकारलेल्या ‘विनोबा’ या नावातून विद्यार्थ्यांनी एकता, सामाजिक बांधिलकी आणि महापुरुषांच्या विचारांप्रती असलेला आदर व्यक्त केला.

 

ओपन लिंक फाउंडेशन व जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या ‘विनोबा ॲप’ या उपक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा अभिनव उपक्रम शाळेच्या वतीने राबविण्यात आला. ‘विनोबा ॲप’च्या माध्यमातून शाळांमध्ये राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण व उपक्रमशील शैक्षणिक उपक्रम तसेच ॲपवर देण्यात आलेले विविध टास्क पूर्ण करून त्यांची नोंद करण्यात येते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मारतळा शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून ‘विनोबा’ हे नाव साकारत आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याला मानवंदना दिली.

 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवि ढगे यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत भूदान चळवळ, ग्रामस्वराज्य, अहिंसा, साधेपणा आणि मानवतेचा संदेश विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. शाळेची विद्यार्थिनी सिद्धी गिरी हिने आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देत त्यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले.

 

या उपक्रमासाठी शिक्षक प्रल्हाद पवार, पांडुरंग पाटील मारतळेकर, सौ. सुषमा चिलकर, सौ. रेवती दमकोडवार, माया शिंदे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांच्या कल्पक सहभागातून साकारलेली मानवी साखळी आणि ‘विनोबा’ हे नाव हा महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्यासोबतच नाविन्यपूर्ण, कृतीशील आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा सुंदर नमुना ठरला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *