व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या काळाबाजारप्रकरणी कारवाई; ८ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त
नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ५२ व्यावसायिक गॅस सिलिंडरसह वाहन ताब्यात

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्हाभरातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या एका इसमावर कारवाई केली. या कारवाईत एकूण ८ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, उस्माननगर रस्त्यावरील कोहिनूर मिलच्या विरुद्ध बाजूस एका छोट्या हत्ती वाहनातून व्यावसायिक गॅस सिलिंडर काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत आहेत. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोन पंचांसमक्ष दुपारच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.
यावेळी टाटा इंट्रा छोटा हत्ती (क्रमांक एमएच-२६-सीएच-४६७७) हे वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर मोठ्या प्रमाणात आढळून आले.
वाहनातील इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव श्यामलाल शंकरलाल सारन (वय ३२, व्यवसाय चालक, रा. बोजासर, जि. फलोदी, राजस्थान; सध्या रा. शिवाजीनगर, मुखेड, ता. मुखेड, जि. नांदेड) असे सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्याने सदर गॅस सिलिंडर काळ्या बाजारात विक्री व रिफिलिंगसाठी आणल्याचे सांगितले. सिलिंडरची वाहतूक व विक्री करण्यासाठी त्याच्याकडे कोणताही वैध परवाना अथवा संबंधित कागदपत्रे आढळून आली नाहीत.
जप्त मुद्देमाल
टाटा इंट्रा छोटा हत्ती वाहन — अंदाजे किंमत ६ लाख
भारत कंपनीचे व्यावसायिक वापराचे एकूण ५२ गॅस सिलिंडर — अंदाजे किंमत २ लाख ३४ हजार
असा एकूण ८ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी श्यामलाल शंकरलाल सारन याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ११८९/२०२६ अन्वये जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील कलम ३ व ७ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



