जिला
जागो युवा, जागो भारत उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे
इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत

नांदेड, १९ सप्टेंबर- राष्ट्रीय स्तरावरील ‘जागो युवा, जागो भारत’ (JYJB) या विद्यार्थी-केंद्रित उपक्रमात नांदेड जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास, सर्जनशीलता, राष्ट्रभावना, सांस्कृतिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने हा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना आणि विचारांना व्यासपीठ मिळावे, यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, चित्रकला, वक्तृत्व, लघुचित्रफीत, रील आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धेत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळांनी पुढाकार घ्यावा
जिल्ह्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकांनी ‘जागो युवा, जागो भारत’ उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांनी JYJB च्या अधिकृत संकेतस्थळावर www.jyjb.in/register येथे संस्थेची तसेच विद्यार्थ्यांची नोंदणी करून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट जिल्हा समन्वयक कविता जोशी (९८६०२६८३६५) यांच्याकडे व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीशाळा आणि विद्यार्थ्यांच्या नोंदणीची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.



