क्राईम

शाहूनगर वाघाळा खूनप्रकरणातील सर्व ६ आरोपी तेलंगणातून अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २४ तासांत आरोपींचा माग काढला

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर, वाघाळा येथे किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी सर्व सहा संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेलंगणातील निझामाबाद येथून १९ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत ही कारवाई केली.
१८ सप्टेंबर रोजी रात्री शाहूनगर वाघाळा येथील पाण्याच्या फिल्टर टाकीजवळ संघरत्न उर्फ डोरेमॉन माधव वाघमारे (वय २०) याच्यावर जुन्या ओळखीच्या मुलांनी किरकोळ वादातून धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर व छातीवर गंभीर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी मृताची आई पंचशिला वाघमारे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १२२४/२०२६, कलम १०३(१), १८९(२), १८९(४), १९१(३) भारतीय न्याय संहिता तसेच कलम ४/२५ भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा व नांदेड ग्रामीण पोलिसांची विविध पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी निझामाबाद, तेलंगणा येथे पळून गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढून १९ सप्टेंबर रोजी निझामाबाद येथून सहाही संशयितांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी : राजदिप उर्फ मॉन्टी दिपक तारु (१९), प्रविण उर्फ बबलु रावसाहेब तारु (१९), आदर्श उर्फ अनिल संजय लोहकरे (२१), साईनाथ उर्फ साई राजु धुमाळे (२०), आदेश उर्फ बंटी संजय कांबळे (२१) आणि माधव आनंदा नवघरे (१९), अशी आरोपींची नावे आहेत.

सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. खुनामागील नेमके कारण आणि प्रत्येक आरोपीची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि गोविंद खैरे, पोउपनि साईनाथ पुयड तसेच पोलीस अंमलदार गुरदिपसिंग कालरा, राजकुमार डोंगरे, ब्रह्मानंद लामतुरे, संदीप घोगरे, संतोष बेल्लुरोड व अमोल घेवारे यांच्या पथकाने केली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *