लोंढे-सांगवी मार्गावर काळ्या हरणाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

लोहा : तालुक्यातील लोंढे-सांगवी-उस्माननगर मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत काळ्या हरणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून अधिकृत अहवाल जाहीर करावा, अशी मागणी अन्यायाशी झुंज संघटनेचे प्रमुख शिवाजी पांडुरंग गोडबोले दगडगांवकर यांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, ४ डिसेंबर २०२५ रोजी पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत काळ्या हरणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वनविभागाने मृत हरणाचा मृतदेह ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले का, मृत्यूचे अधिकृत कारण काय नोंदविण्यात आले, तसेच मृतदेहाची विल्हेवाट कोणत्या नियमानुसार लावण्यात आली, याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच हरणाला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी वनविभागाने केलेली कारवाई, घटनेचा पंचनामा करण्यात आला असल्यास त्याची माहिती आणि या प्रकरणातील संपूर्ण कार्यवाहीचा अधिकृत अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या मार्गावरील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित विभागाने घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती चौकशी व कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र; जिल्हाधिकारी, नांदेड; जिल्हा पोलीस अधीक्षक, नांदेड तसेच सोनखेड येथील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.



