मराठवाडा

ग्रामविकासाच्या वाटेवर आयुष्यभर चाललेला स्वच्छतादूत — माधवराव पाटील शेळगावकर आज आपल्यात नाहीत,ही मोठी खंत आहे.

काही माणसे एखाद्या पदामुळे मोठी होत नाहीत; तर आपल्या कार्यामुळे एखाद्या पदालाच मोठेपण प्राप्त करून देतात. काही व्यक्ती एखाद्या चळवळीचे नेतृत्व करतात; तर काहींच्या जाण्यानेच त्या चळवळीला पोरकेपणाची जाणीव होते. माधवराव पाटील शेळगावकर हे अशाच दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते.१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली. स्वच्छता चळवळ, ग्रामविकास आणि परिवर्तनवादी विचारांशी आयुष्यभर नाते जोडून राहिलेला हा कर्मयोगी आज आपल्यात नाही, ही जाणीवच अस्वस्थ करणारी आहे.

त्यांच्या निधनाने एका व्यक्तीचे नव्हे, तर स्वच्छता आणि ग्रामविकासाच्या चळवळीतील एका जिवंत विचाराचे मोठे नुकसान झाले आहे.
‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ म्हटले की महाराष्ट्रातील ग्रामविकासाच्या क्षेत्रात माधवराव पाटील शेळगावकर यांचे नाव आदराने घेतले जाते. स्वच्छता म्हणजे केवळ रस्ते झाडणे, कचरा उचलणे किंवा गाव सुंदर ठेवणे एवढ्यापुरता त्यांचा विचार कधीच मर्यादित नव्हता.त्यांच्या दृष्टीने स्वच्छता ही सामाजिक परिवर्तनाची पहिली पायरी होती.स्वच्छ गाव, जागरूक नागरिक, निरोगी जीवनशैली, पर्यावरणाचे भान, लोकसहभाग आणि ग्रामविकास यांची त्यांनी सांगड घातली. राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या अनुभवातून अनेक विचार पुढे नेले. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील विविध मंचांवर त्यांनी ग्रामस्वच्छता व ग्रामविकासाचा विचार मांडला. कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत सहभाग नोंदविणे, ही त्यांच्या कार्याची व्यापकता दर्शविणारी बाब होती.

त्यांचे ‘माझी ग्रामविकासाची शेती’ हे आत्मचरित्र म्हणजे केवळ स्वतःच्या जीवनाची कहाणी नाही; ते ग्रामीण समाजजीवन, संघर्ष, ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनाचा एक अनुभवग्रंथ आहे.शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात स्वतःची वाट निर्माण करताना कोणते अनुभव घेतले,कोणत्या अडचणींना सामोरे गेले आणि समाजासाठी काम करताना कोणती मूल्ये जपली, याचे दर्शन या प्रवासातून घडते.या पुस्तकातील अनुभव नव्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते आणि सार्वजनिक जीवनात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी निश्चितच अनुभवांची शिदोरी ठरू शकतात. त्यांच्या आयुष्याकडे पाहिले की जाणवते-ग्रामविकास ही त्यांच्यासाठी एखादी योजना नव्हती; तो त्यांच्या जीवनाचा ध्यास होता.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि परिवर्तनवादी विचारसरणीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर ठसा होता. समाजातील अंधश्रद्धा, विषमता, अस्वच्छता आणि अन्याय यांच्याविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा त्यांना या विचारपरंपरेतून मिळाली.
शेतकरी प्रश्नांशीही त्यांचे घट्ट नाते होते. कै. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम केले. या प्रवासात अडचणी आल्या, त्रास सहन करावा लागला; मात्र समाजहितासाठी स्वीकारलेला संघर्ष त्यांनी कधी ओझे मानला नाही.

शेळगाव गौरी हे त्यांचे गाव. या गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेली धडपड पाहिली की त्यांनी केवळ गावाचा विकास केला नाही, तर गावाच्या विकासाची नवी कल्पनाच उभी केली, असे म्हणावेसे वाटते.गावाच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करताना त्यांनी भौतिक विकासाबरोबरच लोकसहभाग, सामाजिक जाणीव आणि स्वावलंबन यांनाही महत्त्व दिले. म्हणूनच त्यांच्या ग्रामविकासाच्या कामाकडे केवळ एका गावाच्या विकासाच्या चौकटीत पाहता येत नाही. ते ग्रामीण विकासाच्या व्यापक प्रयोगाचा भाग होते.

माधवराव पाटील शेळगावकर यांची वाणी प्रभावी होती. पण त्या प्रभावीपणाला आक्रमकतेची किनार नव्हती. विचार ठाम, भाषा संयमी आणि माणसांविषयी आदर—हे त्यांच्या संवादाचे वैशिष्ट्य होते.एखादा विषय कसा मांडावा, मुद्दा कसा पटवून द्यावा आणि मतभेद असतानाही समोरच्या व्यक्तीचा सन्मान कसा राखावा, याचा वस्तुपाठ त्यांच्या संवादातून मिळत असे.त्यांच्या बोलण्यात द्वेष नव्हता, कटुता नव्हती. विषमताजन्य विचार आणि जातीय संकुचितपणापासून दूर राहून त्यांनी माणुसकी, समता आणि संवादाचा मार्ग स्वीकारला.म्हणूनच ते केवळ चांगले वक्ते नव्हते; ते संवादाचे महामेरू होते.

माधवराव पाटील शेळगावकर यांच्यात विचारांची खोली, संघटनकौशल्य, ग्रामीण प्रश्नांची जाण आणि संवादाची ताकद होती. सार्वजनिक जीवनात त्यांच्या कार्याचा आवाका पाहता, त्यांना राज्याच्या व्यापक राजकीय-सामाजिक क्षेत्रात आणखी मोठी भूमिका मिळाली असती, असे त्यांच्या कार्याचा परिचय असणाऱ्या अनेकांना वाटत राहिले.परंतु पद मिळाले किंवा नाही, यापेक्षा त्यांनी माणसांच्या मनात निर्माण केलेले स्थान अधिक महत्त्वाचे ठरते.त्यांच्या कार्याचा खरा गौरव पदांमध्ये नव्हे, तर त्यांनी जागवलेल्या सामाजिक जाणीवेत आहे.

ग्रामविकास आणि स्वच्छता क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल विविध स्तरांवर घेतली गेली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, केंद्र सरकारचा यशवंत पंचायत राज समृद्ध ग्राम पुरस्कार तसेच राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार अशा गौरवांनी त्यांच्या कार्याला सन्मान मिळाला.मात्र पुरस्कार हे त्यांच्या कार्याचे अंतिम मोजमाप नव्हते. त्यांची खरी कमाई होती—गावागावात निर्माण झालेली स्वच्छतेची जाणीव आणि ग्रामविकासाच्या कामाला मिळालेली प्रेरणा.
माधवराव पाटील हे केवळ धडपडणारे कार्यकर्ते नव्हते. ते चिंतनशील होते.ध्यानसाधनेतही रमणारे होते. कर्म, चिंतन आणि साधना यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जाणवत असे.माउंट अबू येथील ग्रामविकास परिषदेत त्यांनी मांडलेले विचार असोत किंवा विविध व्यासपीठांवरील त्यांचे भाषण—त्यांच्या विचारांत अनुभवाची खोली आणि जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी जाणवत असे.त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता ही त्यांच्या अंतर्मनाच्या निर्मळतेची जणू साक्षच वाटायची.

माझी आणि माधवराव पाटील शेळगावकर यांची भेट काही सार्वजनिक कार्यक्रमांतून झाली. वयाने आणि ज्ञानाने मोठ्या असलेल्या या व्यक्तिमत्त्वाविषयी मनात स्वाभाविकच आदर होता.त्यामुळे त्यांच्याशी फार जवळीक निर्माण करण्याचे धाडस झाले नाही.पण अंतर असूनही मनातला आदर मात्र कायम राहिला.प्रत्येक भेटीत त्यांच्या बोलण्यातून ग्रामविकासाची तळमळ, स्वच्छतेविषयीची बांधिलकी आणि माणसांविषयीची आपुलकी जाणवत असे.समोरच्या व्यक्तीला आदराने संबोधणे, त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि त्याच्याशी सन्मानाने संवाद साधणे, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सहज भाग होता.

आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि त्या छोट्या-छोट्या भेटींच्या आठवणी अधिक मोठ्या वाटू लागल्या. काही व्यक्तींशी आपली जवळीक किती होती, यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आपल्या मनावर किती ठसा उमटवला, हे अधिक महत्त्वाचे असते.
त्यांच्या कार्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या पातळीवर ‘स्वच्छतादूत’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली.त्यांनी त्या संधीचे रूपांतर व्यापक सामाजिक संदेशात केले.स्वच्छता त्यांच्या हातात झाडू नव्हती; ती त्यांच्या विचारांची भाषा होती.गाव स्वच्छ असावे, पर्यावरण निरोगी असावे, माणसांमध्ये परस्पर सन्मान असावा आणि विकासात प्रत्येकाचा सहभाग असावा—हा त्यांचा विचार होता.म्हणूनच त्यांचे कार्य स्वच्छतागृहांपासून सुरू होऊन माणसाच्या मानसिकतेपर्यंत पोहोचते.
आज चळवळ पोरकी झाली आहे…

आज माधवराव पाटील शेळगावकर आपल्यात नाहीत. त्यामुळे स्वच्छता चळवळीतील एक अनुभवी, अभ्यासू आणि संवेदनशील आवाज हरपला आहे.पण एखाद्या कार्यकर्त्याचे खरे निधन तेव्हा होत नाही, जेव्हा त्याचा देह आपल्यातून निघून जातो. त्याने रुजवलेला विचार संपला तरच त्याच्या कार्याचा अंत होतो.माधवरावांनी रुजवलेली स्वच्छतेची जाणीव, ग्रामविकासाची तळमळ, समतेचा विचार, संवादाची संस्कृती आणि माणुसकीची भूमिका आजही जिवंत आहे.
हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.
आज त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होताना मनात एकच विचार येतो—गाव स्वच्छ करण्यासाठी झाडू हातात घेणारे अनेक मिळतील; पण माणसांचे मन निर्मळ करण्यासाठी आयुष्य झोकून देणारे माधवराव पाटील शेळगावकर पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत.

त्यांनी स्वच्छतेला चळवळ दिली, ग्रामविकासाला दिशा दिली आणि सार्वजनिक जीवनाला माणुसकीची किनार दिली.
नितळ-निर्मळ मनाच्या या स्वच्छतादूताला भावपूर्ण श्रद्धांजली!त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.त्यांच्या विचारांना सलाम.आणि त्यांनी दाखवलेल्या स्वच्छ, समतामूलक ग्रामविकासाच्या वाटेवर चालणे—हीच त्यांना खरी आदरांजली!
— पंडित पवळे, नांदेड
मो.9890232962

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *