नांदेड पोलिसांची विशेष मोहीम; ४१.३१ लाखांचे ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत

नांदेड, दि. २ : नागरिकांचे गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी नांदेड पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला यश आले आहे. सायबर पोलीस व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी तांत्रिक तपास आणि केंद्र शासनाच्या CEIR (Central Equipment Identity Register) प्रणालीचा प्रभावी वापर करून तब्बल ३०५ मोबाईल फोन शोधून हस्तगत केले आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत ४१ लाख ३१ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा तसेच विविध ठिकाणांहून नागरिकांचे मोबाईल गहाळ अथवा चोरीस गेल्याच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गहाळ मोबाईल शोधण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार मोबाईलचे IMEI क्रमांक, पोलीस अभिलेख तसेच CEIR प्रणालीच्या माध्यमातून शोधमोहीम राबविण्यात आली.
तांत्रिक तपासादरम्यान शोध लागलेल्या मोबाईलची माहिती संबंधित मालकांशी पडताळून पाहण्यात आली. त्यानंतर एकूण ३०५ अँड्रॉईड मोबाईल हस्तगत करून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक दिलासा मिळाला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच CEIR पोर्टलवर मोबाईलची माहिती नोंदवून तो ब्लॉक/ट्रेस करण्याची कार्यवाही करावी. मोबाईलचा IMEI क्रमांक सुरक्षितपणे जतन करून ठेवावा, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे.



