क्राईम

सोनाई नगरातील कुंटणखान्यावर नांदेड पोलिसांचा छापा; तीन पीडित महिलांची सुटका

सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; ३४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

 

नांदेड : शहरातील अनैतिक मानवी व्यापाराला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेंतर्गत सोनाई नगर परिसरातील शिवसाई अपार्टमेंट येथे सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, सहा आरोपींविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून ३४ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार नांदेड शहरातील अनैतिक मानवी व्यापार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) २९ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई केली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सोनाई नगर येथील शिवसाई अपार्टमेंटमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी शासकीय पंचांच्या उपस्थितीत एका सामाजिक कार्यकर्त्याला बनावट ग्राहक म्हणून संबंधित ठिकाणी पाठविले. तेथे वेश्यागमनासाठी व्यक्ती निश्चित झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे संकेत मिळताच पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.

या कारवाईदरम्यान रणजितकौर अजय तिवारी (वय ५०, रा. सोनाई नगर), धरमसिंग महीद्रसिंग अलग (वय ३१, रा. सोनाई नगर), दत्ता हरी उमरे (वय ४०, रा. विद्युतनगर), आशिष साहेबराव किर्तणे (वय २५, रा. सर्वदयनगर), मनोज नामदेव सूर्यवंशी (वय २२, रा. चैतन्य नगर) आणि महेश राजू वाघमारे (वय २५, रा. चिखलवाडी), या सहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

छाप्यादरम्यान संबंधित ठिकाणाहून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून वेश्या व्यवसायासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ३४ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.

या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२६/२०२६ अन्वये अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ४, ५, ६ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *