युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे नेतृत्व वैष्णवी परदेशी, तर मुलांच्या संघाचे नेतृत्व अयान सोराठिया यांच्याकडे
पुणे येथे मंगळवारपासून रंगणार ४१ वी सीएम चषक युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा; मुलींच्या संघाला विजेतेपद राखण्याचा विश्वास

पुणे : महाराष्ट्राच्या वैष्णवी परदेशी आणि अयान सोराठिया यांची अनुक्रमे मुलींच्या व मुलांच्या महाराष्ट्र बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. पुण्यातील चोंढे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सीएम चषक ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत हे दोन्ही संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
१६ वर्षांखालील खेळाडूंसाठी आयोजित ही आठ दिवसीय राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या (एमएसबीए) वतीने भारतीय बास्केटबॉल महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना पदकाची अपेक्षा
स्पर्धेत महाराष्ट्राच्या कामगिरीबाबत महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद कृष्णन मुथुकुमार यांनी विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ उत्कृष्ट कामगिरी करतील आणि पदक मिळवण्यात यशस्वी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुथुकुमार म्हणाले, “२०११ नंतर महाराष्ट्रात राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन होत असल्याने आम्ही दोन्ही संघांसाठी विशेष तयारी केली आहे. खेळाडूंसाठी दोन दीर्घकालीन प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मागील वर्षी पुद्दुचेरी येथे झालेल्या स्पर्धेत मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले होते. यंदाही मुलींचा संघ विजेतेपद कायम राखेल, असा आम्हाला विश्वास आहे. मुलांचा संघही पदक पटकावेल, अशी अपेक्षा आहे.”
महाराष्ट्राचा मुलींचा संघ
वैष्णवी परदेशी (कर्णधार), तन्वी जाधव, सिया भोसले, सायसा भगत, त्रिशा कार्की, ध्रुवी पिसाळ, शरण्या सावंत, नायला इनामदार, अनुषा सोंटक्के, कनिष्का गायकवाड, पंखुडी बडे आणि तानिरिका चक्रवर्ती.
प्रशिक्षकवर्ग : मुख्य प्रशिक्षक ललित नाहटा, प्रशिक्षक दशरथ बिरमाने, सोनेश झोरे आणि व्यवस्थापक देवांशी लुनावत.
महाराष्ट्राचा मुलांचा संघ
अयान सोराठिया (कर्णधार), अमेय दरवटकर, इमरान अन्सारी, आराध्य भावसार, अयमन शेख, केविन नाडर, ओम राऊत, अंश भाटिया, जिवित आवटे, हर्षित बरहट, आरव पांडे आणि गुलशेरखान पठाण.
प्रशिक्षकवर्ग : मुख्य प्रशिक्षक नासिर अन्सारी, प्रशिक्षक रोहन जगताप, संकेत भगवत आणि व्यवस्थापक ओंकार धाराशिवकर.
महाराष्ट्राच्या संघांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा
विशेष प्रशिक्षण शिबिरे आणि सरावाच्या जोरावर महाराष्ट्राचे दोन्ही संघ राष्ट्रीय स्पर्धेत प्रभावी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुलींच्या संघाला गतविजेतेपद कायम राखण्याचे आव्हान असणार आहे, तर मुलांचा संघही पदक जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.



