मराठवाडा

गुरुद्वारा सचखंड बोर्ड बहाल होताच २० ते २५ कोटींच्या सेवांची घोषणा; वैद्यकीय सुविधा, सौरऊर्जा प्रकल्पासह विविध उपक्रम राबविणार

नांदेड : गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड पूर्ववत बहाल झाल्याच्या आनंदात बोर्डाचे मीत प्रधान स. गुरिंदरसिंघ जी बावा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे २० ते २५ कोटी रुपयांच्या विविध सेवांची घोषणा केली आहे. यामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तपासणी केंद्र, सौरऊर्जा प्रकल्प, कर्मचाऱ्यांना बोनस आणि विधवा महिलांना दिवाळी भेट अशा उपक्रमांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने मा. न्यायालयाच्या आदेशानुसार २६ ऑक्टोबर २०२६ रोजी ऐतिहासिक निर्णय घेत २९ जून २०२२ रोजीची स्थिती पूर्ववत करून गुरुद्वारा सचखंड बोर्ड बहाल केला. या निर्णयाबद्दल संपूर्ण साधसंगतने आनंद व्यक्त केला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही बोर्डाच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत

.यंदाच्या दिवाळी आणि गुरुतागद्दी सोहळ्याच्या निमित्ताने बोर्डाने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. गुरुद्वारा बोर्डाच्या सर्व कायमस्वरूपी, रोजंदारी, आगिया आणि मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या ५० टक्के बोनस देण्यात येणार आहे. तसेच बोर्डाच्या यादीतील सर्व विधवा महिलांना दिवाळी भेट म्हणून एक हजार रुपये अतिरिक्त पेन्शन दिली जाणार आहे.

१५ कोटींचे अत्याधुनिक वैद्यकीय तपासणी केंद्र

बोर्डाचे मीत प्रधान स. गुरिंदरसिंघ जी बावा आणि त्यांच्या सहकारी ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे १५ कोटी रुपये खर्चून एमआरआय, सिटी स्कॅन, एक्स-रे, रक्त तपासणी आणि सोनोग्राफीसह विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या केंद्रात सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

५ कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प

हैदराबाद येथील गुरुघराचे प्रेमी स. सुरिंदरसिंघ सलुजा यांच्या सहकार्याने गुरुद्वारा परिसरात सुमारे पाच कोटी रुपये खर्चाचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुरुघराच्या वार्षिक वीज बिलात होणारी बचत गुरसिख मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

याशिवाय भविष्यात संगतच्या सेवेसाठी निवास व्यवस्था, रुग्णालय, शिक्षण आणि इतर सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे बोर्डाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

या सर्व सेवांची माहिती गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे सचिव स. रविंदरसिंघ बुंगई यांनी दिली. गुरुद्वारा बोर्डाच्या पुनर्बहालीच्या आनंदात समाजोपयोगी सेवांची झालेली ही घोषणा साधसंगतसाठी विशेष आनंदाची बाब ठरत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *