युवा प्रतिभेची राज्यस्तरावर झेप! अभिजीत कोलते यांची राज्यस्तरीय विकसित भारत युवा संसदेसाठी निवड
मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने मुक्तहस्ते उधळलेल्या सौंदर्याप्रमाणेच ग्रामीण मातीतही प्रतिभेची असंख्य बीजे रुजलेली असतात. याच प्रतिभेचा प्रत्यय देत तालुक्यातील मौ.चिलपिंपरी येथील मूळ रहिवाशी असलेले होतकरू विद्यार्थी अभिजीत सुनीता संजय कोलते यांनी यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत युवा संसद’ उपक्रमांतर्गत अभिजीत कोलते यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, संसदीय कार्यपद्धतीचे ज्ञान आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, या उद्देशाने ‘माय भारत’ तर्फे युवा संसदेचे आयोजन करण्यात येते.
अभिजीत कोलते यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर प्रभावी, अभ्यासपूर्ण व सखोल संशोधन केलेले इंग्रजी भाषण देऊन हा सन्मान मिळवला. सदर कार्यक्रम जिल्हा युवा अधिकारी अशनी कानकटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, यापूर्वीही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित विज्ञान काँग्रेसमध्ये त्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती. भारत स्काऊट्स अँड गाईड्सचा प्रतिष्ठेचा राज्य पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. नवी दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती मिळविण्याचा बहुमानही त्यांनी संपादन केला असून, नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई यांच्या वतीनेही त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. बालवयापासूनच विविध ऑलिम्पियाड व अनेक स्पर्धांमध्ये पदके व सन्मान प्राप्त करणाऱ्या या विद्यार्थ्याने अभ्यास, विज्ञान, भाषा, वक्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध क्षेत्रांत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
अभिजीत कोलते यांच्या सादरीकरणातून त्यांची भाषेवरील प्रभुत्व, वक्तृत्वकला, बौद्धिक खोली आणि विषयावरील मजबूत पकड दिसून आली. या उल्लेखनीय सादरीकरणाची दखल घेत त्यांची राज्य विधानसभा ठिकाणी आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या राज्यस्तरीय निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



