डॉ. राम वाघमारे यांनी पुंडलिकराव थोटवे यांच्या जीवनाचे अंतरंग समर्थ शैलीत अभिव्यक्त केले- श्रीपाल सबनीस

नांदेड, 17- डॉ. राम वाघमारे यांचे लेखन अत्यंत प्रामाणिक, संयमी आणि प्रभावी आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबमीस यांनी व्यक्त केले.
डॉ. राम वाघमारे लिखित सृजनशील अभियंता पुंडलिकराव थोटवे या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन पुणे येथे नुकतेच करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखक्षयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव इंजि. विलास राजपूत, आयकर आयुक्त डॉ. कैलास गायकवाड, जलसंपदाचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ, यशदाचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड, ज्येष्ठ लेखक व साहित्यिक राम वाघमारे आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, राम वाघमारे यांच्या लेखनात जशी कमालीची नम्रता आहे तसेच त्यांच्या स्वभावतही आहे. पंधरा पुस्तकांचे लेखक असतानाही ते अतिशय सभ्यपणे बोलतात, वागतात. डॉ. बबन जोगदंड सारख्या मित्रांना ते मार्गदर्शक मित्र म्हणून संबोधतात आणि जोगदंड सुद्धा राम वाघमारे यांना अत्यंत प्रभावी लेखक म्हणून गौरव करतात, अशी ही मैत्री दुर्मिळच आहे. डॉ. राम यांची लेखणी अत्यंत प्रभावी आहे. लेखकांनी चरित्र नायकाशी किती एकरूप व्हावे, याचे उत्तम उदाहरण या लेखनात स्वयंसिद्ध झाले आहे. पुंडलिकराव थोटवे यांच्या जीवनाचे अंतरंग डॉ. राम वाघमारे यांनी समर्थ शैलीत अभिव्यक्त केले. त्यामुळे लेखक व चरित्र नायक यांच्यातील स्वाभाविक व्देदत्व संपुष्टात येऊन चरित्रात्मक कलाकृती मराठीला मिळाली आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी विलास राजपूत म्हणाले, वाघमारे यांच्या लेखनित सर्जनशील अभियंता पुंडलिकराव थोटवे हा चरित्र ग्रंथ मराठी चरित्र लेखन प्रवाहात अनेक गुणवैशिष्ट्यामुळे स्वतःचे वेगळेपण सिद्ध करतो. तर लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, सामान्य माणसातील असामान्य गुण ओळखून त्यांना प्रकाशात आणण्याचे मोठे कसब लेखक डॉ. राम वाघमारे यांच्यात आहेत. त्यांच्या लेखन शैलीचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे. मी नांदेडकर म्हणून मला राम वाघमारे यांचा अभिमान वाटतो. आजतागायत प्रकाशित झालेल्या चरित्र लेखनातील हे पुस्तक नक्कीच वेगळे व आधारित करणारे, मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण करणारे आहे असे मत त्यांनी मांडले.
डॉ. हेमंत धुमाळ यांनी सांगितले की, अगदी बारीक बारीक प्रसंग लेखकाने अतिशय प्रभावी व ओघवती भाषा वापरून या चरित्रात्मक पुस्तकाला खूपच उंचीवर नेले आहे. काही बालपणीच्या प्रसंगात तर वाचक गहिवरून जातो. हे लेखकाचे मोठे यश आहे, असेही ते म्हणाले. स्वयंनदीप प्रकाशनच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बबन जोगदंड यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. यावेळी साहित्यिक, साहित्यप्रेमी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.



