मुखेड पंचायत समिती येथे आज तक्रार निवारण दिनाचे आयोजन

नांदेड, 3- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून प्रत्येक पंचायत समिती स्तरावर नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येतो. आज मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती मुखेड येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ज्या तक्रारदारांनी आपली तक्रार दिली आहे, त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी केले आहे.



