नावघाट ब्रिजवर वादातून युवकाला मारहाण प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल

इतवारा, नांदेड | १२ एप्रिल २०२५ – नावघाट ब्रिज, इतवारा परिसरात किरकोळ कारणावरून वाद घालून एका युवकास जबर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इतवारा पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहमद अदनान मोहमद अशपाख (वय २३, व्यवसाय – व्यापार, रा. इतवारा, नांदेड) हे नावघाट ब्रिजवर होते. यावेळी अब्दुल असद अब्दुल समद व इतर आरोपींनी संगणमत करून फिर्यादीस धक्का मारल्याचे कारण देत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर मारहाण करत गंभीर दुखापत केली. तसेच त्यास जिवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेबाबत पोलीस ठाणे इतवारा येथे गुन्हा नं. 129/2025 भा.दं.सं. अंतर्गत नव्या भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 118(2), 115(2), 351(1)(2)(3).3(5) व हत्यारे अधिनियमाच्या कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत असून, पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.



