ग्रामीण पोलीसांकडून अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्परवर व मुद्देमाल जप्त

नांदेड, 15 एप्रिल – अवैध गौण खनिज वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एक टिप्पर आणि ०३ ब्रास रेती असा एकूण १०,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सुरू असलेल्या गस्तीदरम्यान रविनगर, कौठा येथे करण्यात आली.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत सर्व पोस्टे प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध रेती, अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ भोसले, पोना माधव डफडे, पोकॉ कवठेकर यांनी ही यशस्वी कारवाई केली.
दिनांक १४ एप्रिल रोजी रात्री ११.३० च्या सुमारास पोलिस गस्तीदरम्यान रविनगर, कौठा येथे टिप्पर (क्र. MH-29-BE-2043) मध्ये अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा आरोपी दत्तराम रामजी लोंढे (रा. असर्जन, ता. व जि. नांदेड) हा पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडून टिप्पर व ०३ ब्रास रेती असा एकूण १०,१२,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून, अवैध रेती वाहतुकीविरोधातील ही धडक मोहीम भविष्यातही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.



