गडचिरोलीतील तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांना पत्नीवर पिस्तूल रोखल्याप्रकरणी नांदेड पोलिसांकडून अटक

नांदेड, 16 एप्रिल: मूलबाळ होत नाही म्हणून पत्नीला मारहाण करून तिच्यावर पिस्तूल रोखणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोऱ्यात कार्यरत तहसीलदाराला नांदेड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव अविनाश श्रीराम शेंबटवाड (३४) असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
अविनाश शेंबटवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून, सध्या गडचिरोलीच्या धानोरा तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, दोघांचा विवाह दीड वर्षांपूर्वी नांदेडच्या मगनपुरा भागात थाटामाटात पार पडला होता. लग्नावेळी मोठ्या प्रमाणावर मानपान, सोने व इतर साहित्य दिले होते.
तक्रारीनुसार, लग्नानंतर अविनाश व त्यांच्या कुटुंबीयांनी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. कर्तव्याच्या ठिकाणीही तिच्यावर वेळोवेळी मारहाण केली जात होती. पत्नीचा आरोप आहे की, एकदा तर अविनाश यांनी तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलही रोखले.
या प्रकरणी ११ मार्च २०२५ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अविनाश शेंबटवाड यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांच्या आई-वडील व डॉक्टर असलेल्या दोन भावांविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अविनाश शेंबटवाड हे नांदेडात असल्याची माहिती मिळाल्यानंतर १३ एप्रिल रोजी पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे करत आहेत.



