IPLमधून मोठा धक्का! कॅगिसो रबाडाचा धक्कादायक खुलासा, बंदी असलेल्या औषधाचे सेवन मान्य, स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली : आयपीएल 2025 मधून एक मोठी आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा याने बंदी असलेल्या औषधाचे सेवन केल्याचे स्वतः मान्य करत, आयपीएलमधून माघार घेतली आहे. यामुळे त्याच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून तो सध्या मायदेशी दक्षिण आफ्रिकेत परतला आहे.
यंदाच्या हंगामात रबाडा केवळ दोन सामने खेळल्यानंतर वैयक्तिक कारणं सांगत स्पर्धेतून बाहेर पडला होता. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्या नमुन्यात बंदी असलेल्या औषधाचे अंश आढळून आल्यामुळे त्याने ही माघार घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेटर्स असोसिएशनमार्फत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात रबाडाने म्हटले की,
“माझ्या शरीरात बंदी असलेल्या औषधाचे अंश सापडले आहेत. मी सध्या तात्पुरत्या बंदीचा सामना करत आहे. या गोष्टीबद्दल मी सर्व चाहत्यांची आणि संघाची माफी मागतो. लवकरच मी मैदानावर पुनरागमन करेन.”
गुजरात टायटन्सने रबाडाला १०.७५ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. मात्र आता त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या खेळावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
रबाडावर किती काळ बंदी लागू शकते?
जागतिक उत्तेजक विरोधी संस्था (WADA) च्या नियमांनुसार, बंदी असलेल्या औषधाचे सेवन करणाऱ्या खेळाडूला किमान तीन महिने ते कमाल चार वर्षांपर्यंत बंदीची शिक्षा होऊ शकते. जर खेळाडूने हे औषध अज्ञानावश घेतले असल्याचे किंवा स्पर्धेच्या वेळेत घेतले नसल्याचे पुराव्याने सिद्ध केले, तर बंदीचा कालावधी कमी होऊ शकतो. तसेच, अधिकृत पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाल्यास ही बंदी दोन महिन्यांपर्यंतही मर्यादित होऊ शकते.
नेमकं कोणतं औषध घेतलं?
रबाडाच्या पत्रकात नेमकं कोणतं औषध घेतल्याचं नमूद करण्यात आलेलं नाही. मात्र पुढील तपासणी आणि वाडा किंवा संबंधित संस्था यांच्याकडून माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.



