जिल्हा परिषद नांदेड: बदल्यांचा हंगाम सुरु पहिल्याच दिवशी वित्त, जलसंधारण व सामान्य प्रशासन विभागातील 108 अधिकारी कर्मचा-यांच्या बदल्या

नांदेड,6- जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्यांच्या प्रक्रियेला आज मंगळवार दिनांक 6 मे पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी वित्त विभाग, जलसंधारण विभाग व सामान्य प्रशासन विभागातील सुमारे 108 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाद्वारे करण्यात आल्या.
ही प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बदल्यांचे समुपदेशन व विभागनियोजन शासन निर्णयाच्या निकषांनुसार पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहेत.
वित्त विभागात विविध संवर्गातील 7 जणांच्या बदल्या झाल्या आहेत. यात कनिष्ठ लेखा अधिकारी संवर्गात प्रशासकीय कारणावरून 2 बदल्या करण्यात आल्या. वरिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गात 4 बदल्या झाल्या यात 2 प्रशासकीय तर 2 विनंतीचा समावेश आहे. कनिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गात विनंतीने 1 बदली झाली आहे. तर जलसंधारण विभागात प्रशासकीय कारणामुळे 1 बदली झाली आहे.
सामान्य प्रशासन विभागात विविध संवर्गातील 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सहाय्यक प्रशासन अधिकारी संवर्गात प्रशासकीय बदली 4,
कनिष्ठ प्रशासन अधिकारी संवर्गात प्रशासकीय बदली 5 व विनंती 2 असे एकुण 7 बदल्या झाल्या. वरिष्ठ सहाय्यक संवर्गात प्रशासकीय बदली 5 व विनंती बदली 12, कनिष्ठ सहाय्यक संवर्गात प्रशासकीय बदली 36 तर विनंती वरुन 36 बदल्या झाल्या आहेत.
बदल्या प्रक्रियेदरम्यान सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज आदी अधिकारी उपस्थित होते.
पारदर्शक प्रक्रिया व सुविधा
संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यात आली असून व्हिडीओ शूटिंगही करण्यात येत आहे. उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून बदल्यांना उपस्थित राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोठा पेंडॉल, डेजर्ट कुलर आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज कृषी, पशुसवंर्धन व शिक्षण विभागाच्या बदल्या
आज बुधवार दिनांक 7 मे रोजी कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग व प्राथमिक शिक्षक वगळून शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाव्दारे पार पाडण्यात येणार आहेत.



