शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲप उपलब्ध; आधुनिक शेतीकडे स्मार्ट पाऊल
शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करावे -मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे आवाहन

नांदेड, 23, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विकसित करण्यात आलेले महाविस्तार AI हे अत्याधुनिक ॲप राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता उपलब्ध करण्यात आले आहे. राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ॲपचे लोकार्पण करण्यात आले.
शेतकऱ्यांनी Google Play Store वर Mahavistar AI असे शोधून हे ॲप डाऊनलोड करावे व त्यामधील विविध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली व कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांनी केले आहे.
या ॲपमध्ये शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय सल्ला, सर्व पिकांचे मानक कार्यपद्धती, मृदा आरोग्य पत्रिका, खत मात्रा गणक, हवामानानुसार शेती सल्ला, कीड व रोग व्यवस्थापन, महाराष्ट्रातील बाजारभाव, कृषी पणन मंडळांची गोदाम माहितीDBT योजनांची सविस्तर माहिती व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा प्रभावी उपयोग करून शेतकरी अधिक उत्पादनक्षम व फायदेशीर शेती करू शकतात.
सध्या राज्यातील लाखो शेतकरी डिजिटल शेतीकडे वाटचाल करत असून, महाविस्तार AI ॲपमुळे ही वाटचाल अधिक सुलभ तसेच विज्ञानाधिष्ठित होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून आधुनिक शेतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले आहे.



