नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई : 1.5 किलो गांजासह आरोपी गजाआड

नांदेड – ऑपरेशन फ्लश आउट मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करून 1.5 किलो गांजा जप्त केला.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशील कुमार नायक तसेच पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे यांच्यासह पथकातील अंमलदार सहभागी होते.
गुप्त माहितीवरून कारवाई, दिनांक 31 मे 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे यांना माहिती मिळाली की, माधव बालाजी उबाळे (रा. क्रांतीनगर, असर्जन) हा गांजाची विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचासह छापा टाकण्यात आला.
छाप्यात आरोपीच्या ताब्यातून 1.520 किलो गांजा (किंमत 30,400 रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडे नायलॉनच्या पोत्यात गांजा पाला, काड्या व बियांसह साठवून ठेवलेला आढळून आला.
या कारवाईची वरिष्ठांनी प्रशंसा केली असून, आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील तपास पोउपनि महेश गायकवाड करत आहेत. नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या धडक कारवाईने अवैध पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.



