अवेळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान – काँग्रेसतर्फे खासदार रविंदर चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेड, १५ जून: नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विशेषतः केळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची आवश्यकता असल्याने काँग्रेसतर्फे खासदार रविंदर चव्हाण यांनी काल सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवण्याची मागणी केली.
या बैठकीत खासदार चव्हाण यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादन पट्ट्यातील अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
खते, बियाणे, औषधांबाबतही महत्त्वाच्या सूचना यावेळी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते, बियाणे व औषधींचा मुबलक आणि योग्य दराने पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, तसेच आगाऊ रक्कम घेणाऱ्या विक्रेत्यांवर कडक नजर ठेवावी, अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
खासदारांनी तालुकास्तरावर बफर स्टॉक उपलब्ध करून खत व बियाण्यांचा वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांना सक्रिय ठेवण्याची मागणी केली.
या बैठकीस माजी आमदार हाणमंतराव पा. बेटमोगरेकर, आनंदराव पा. चव्हाण, संजय बेळगे तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेसचा पुढाकार या बैठकीत घेतलेल्या सूचना व मागण्या तातडीने अंमलात आणून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा दिलासा मिळावा, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



