नांदेड जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई; 3.36 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, १५ जून २०२५: जिल्ह्यात अवैध दारू व हातभट्टी दारूच्या उत्पादन-विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत मास रेड राबवण्यात आली. या विशेष मोहिमेत एकूण ६१ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६१ आरोपींवर कारवाई करत ३,३६,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही मास रेड १४ जून रोजी नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी राबवण्यात आली. यामध्ये अवैध दारू तयार करणारी केंद्रे, साठवणूक व विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकून कार्यवाही करण्यात आली.
या मोहिमेत सहभागी अधिकारी व यंत्रणा: या व्यापक कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे (भोकर), सुरज गुरव (नांदेड) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. स्थानिक गुन्हे शाखा, विविध उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणी व प्रभारी अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अंमलदार सहभागी होते.
कारवाईचा तपशील: गुन्हे दाखल: 61, आरोपींवर कारवाई: 61, एकूण मुद्देमाल: ₹3,36,880/- (हातभट्टी दारू, साठवलेली दारू, साहित्य व अन्य वस्तूंसह)
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आवाहन
जिल्ह्यात अवैध धंदे व दारूविक्री रोखण्यासाठी भविष्यातही अशी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अवैध धंद्यांना साथ न देता पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पोलीस प्रशासनाचे धडक पाऊल, गुन्हेगारांवर वचक
ही कारवाई अवैध दारूविक्री करणाऱ्यांसाठी मोठा इशारा असून, नांदेड जिल्ह्यातील अशा प्रकारच्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.



