नांदेड विमानतळाचे एमएडीसीकडे हस्तांतरण पूर्ण; नांदेड-मुंबई विमान सेवा पुनश्च सुरू होण्याची शक्यता

नांदेड | २५ जून २०२५ नांदेडवासीयांसाठी एक दिलासादायक घडामोड – नांदेड विमानतळाचे व्यवस्थापन अखेर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे (एमएडीसी) सुपूर्द करण्यात आले आहे. यामुळे येत्या काळात धावपट्टीचे नुतनीकरण, विमानतळाच्या सुविधांचा विस्तार, आणि विशेषतः नांदेड-मुंबई विमान सेवा पुन्हा सुरू होण्याबाबत सकारात्मक हालचाली अपेक्षित आहेत.
या हस्तांतरणाची औपचारिक प्रक्रिया २३ जून रोजी डॉ. निशीकांत देशपांडे (सहसंचालक,एमआयडीसी) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कल्पेश लोहीवाल (कार्यकारी अभियंता, एमआयडीसी), राजाराम गुठळे (कार्यकारी अभियंता, एमआयडीसी) आणि राजेश पौडवाल (एअरपोर्ट डायरेक्टर) आदी अधिकारी उपस्थित होते.
पूर्वी नांदेड विमानतळाचे संचालन रिलायन्स कंपनीकडे होते. मात्र, व्यवस्थापनातील अपयश, वाढती तक्रारी आणि विमानसेवा बंद होणे या पार्श्वभूमीवर या विषयाची दखल विधानसभेतही घेण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कार्यवाहीचे आश्वासन दिले होते आणि आता त्यांच्या कार्यकाळातच ही महत्त्वपूर्ण पायरी उचलण्यात आली आहे.
डॉ. देशपांडे यांनी माहिती देताना सांगितले:
“हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता येथील पायाभूत सुविधा उभारणे, धावपट्टीची सुधारणा व सेवांचा विस्तार यावर भर दिला जाणार आहे. नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल, अशी आमची तयारी आहे.”
या हालचालीमुळे नांदेड विमानतळाचा विकास वेगाने होईल, आणि नागरिकांना सुलभ, जलद व नियमित हवाई सेवा लाभेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
विमानसेवा सुरु झाल्यास व्यवसाय, पर्यटन आणि वैद्यकीय प्रवासाला चालना मिळेल, असे स्थानिक व्यापाऱ्यांचेही मत आहे.



