नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उपशावर मोठी कारवाई: ३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, तराफे नष्ट

नांदेड | प्रतिनिधी | २५ जून २०२५ नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण, लिंबगाव आणि कुंटूर पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तरित्या कारवाई करत ₹३,००,००० हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून काही तराफे जागीच नष्ट करण्यात आले.
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण : मुद्देमाल: २ इंजिन – ₹२,००,०००, ८ ब्रास रेती – ₹४०,०००, ५ तराफे – जागीच जाळून नष्ट, एकूण किंमत: ₹२,४०,०००
पोलीस स्टेशन कुंटूर: मुद्देमाल: १२ ब्रास रेती – ₹६०,०००
पोलीस स्टेशन लिंबगाव: मुद्देमाल: २ तराफे – जागीच नष्ट, एकूण अंदाजित किंमत: ₹३,००,०००
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर (नांदेड ग्रामीण), सपोनि विशाल भोसले (कुंटूर), सपोनि पंढरी बोधनकर (लिंबगाव) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकांनी २४ व २५ जून रोजी विष्णुपुरी, असर्जन, राहेर आणि थुगाव येथील गोदावरी नदीपात्रात छापे टाकले. यावेळी विनापरवाना इंजिन आणि तराफ्यांच्या साहाय्याने रेती उपसण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले.
तत्काळ कारवाई करत अवैध उत्खननाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ताराफे जागीच नष्ट करण्यात आले. या प्रकरणात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोनि ओमकांत चिंचोलकर, सपोनि विशाल भोसले, सपोनि पंढरी बोधनकर, सपोनि माधव गवळी, पोह रमन बैनवार, हंबर्ड, काजी, पोना डफडे, पोकों इंगळे, पोकों सिद्धेश्वर कवठेकर, बाराळे इत्यादींनी ही कारवाई केली.
या यशस्वी कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांनी सहभागी पथकांचे कौतुक व अभिनंदन केले असून, अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.



