नांदेड शहरात वाहतूक पोलिसांची विशेष कारवाई: ५.३० लाखांचा दंड वसूल

नांदेड | २५ जून २०२५ शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नांदेड पोलीस दलाने वजिराबाद व इतवारा शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण ४२९ वाहनचालकांवर कारवाई करून ₹५,३०,२००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वजिराबाद वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे व इतवारा वाहतूक शाखेचे पोनि जगन पवार, तसेच दंगा नियंत्रण पथकाच्या सहकार्याने हे अभियान राबवण्यात आले.
वजिराबाद विभागाची कारवाई:
वजिराबाद चौक, कलामंदिर, महावीर चौक, रेल्वे स्टेशन, हिंगोली गेट या ठिकाणी तपासणी करण्यात आली. तपासलेली प्रकरणे: 285, अपूर्ण कागदपत्रे, ट्रिपल सीट, वर्दीशिवाय वाहनचालक यांच्यावर कारवाई, वसूल दंड: ₹३,५३,६५०/-
इतवारा विभागाची कारवाई:
जुना मोंढा, हबीब टॉकीज, देगलूर नाका, बर्की चौक येथे कारवाई करण्यात आली.
तपासलेली प्रकरणे: 144, अवैध प्रवासी वाहतूक, कागदपत्रे अपूर्ण असलेली वाहने व हातगाड्यांवर कारवाई वसूल दंड: ₹१,७६,५५०/-
या तपासणी मोहिमेत वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, विमा, परवाना, परमिट, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारे अॅटो आणि बेशिस्तपणे पार्क केलेली वाहने यावर विशेष भर देण्यात आला.
शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक शाखेची ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे. पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, वाहन चालवताना सर्व आवश्यक कागदपत्रे बाळगा आणि वाहतूक नियमांचे पालन करा.



