IPS officers Transfers in Maharashtra state राज्यातील 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुण्यात 3 नवे IPS अधिकारी

मुंबई – राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या असून, तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रमोशन आणि डिमोशनसह पार पडल्या आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे, संभाजीनगर, धुळे, हिंगोली आणि जळगाव यांसारख्या प्रमुख शहरांतील अधिकारी या बदल्यांमध्ये सामील आहेत.
पुण्यातील शस्त्र निरीक्षक शाखेचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली करून त्यांना राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1, पुणे येथे समादेशकपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर, महेंद्र पंडित यांची स्तंभ 2 मधून स्तंभ 3 मध्ये बदली होऊन त्यांना बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी नेमण्यात आले आहे.
स्मार्तना पाटील, पुणे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त, यांची बदली पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे करण्यात आली आहे, तर वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची देखील बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार, पुण्यात तीन नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
त्याआधी, राज्यात 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर मागील आठवड्यात आणखी 4 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. त्यामध्ये, पराग सोमन यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (मुंबई मेट्रो क्षेत्र) येथून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली. सचिन कळंत्रे, अमरावतीचे आयुक्त, यांची बदली यशदा पुणेच्या उपसंचालकपदी करण्यात आली.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांची बदली मुंबईत पोलीस उपायुक्तपदी, तसेच विजय पवार, सुनिल लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांची देखील मुंबईतील उपायुक्त पदावर नियुक्ती झाली आहे.यामुळे एकूण ५ आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईतील पोलीस उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे.



