नांदेड पोलिसांची मोठी कारवाई – ‘छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’च्या नावाखाली तब्बल 1.85 कोटी रुपयांची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार जेरबंद!

नांदेड – “छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, धार” या संस्थेच्या नावाखाली आणि ती महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था असल्याचे भासवून, गोरगरीब मजूर वर्गाची 1,85,37,754 रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपी बाबासाहेब शंकर सुतारे (वय 39, रा. धार, जि. हिंगोली) आणि त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखा नांदेडच्या पथकाने लातूर येथून अटक केली आहे.
गुन्ह्याची तक्रार अनिल गुणाजी पाईकराव (रा. वैशाली नगर, नांदेड) यांनी 28 ऑगस्ट 2023 रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
तक्रारीनुसार, आरोपी सुतारे याने संस्था महाराष्ट्र शासनाशी संबंधित असल्याचे भासवून, लोकांना फसवण्यासाठी खालील योजना जाहीर केल्या:
₹1100 मध्ये – 30 किलो गहू, 25 किलो तांदूळ, 10 किलो साखर, इ.
₹30,000 मध्ये – इलेक्ट्रिक स्कूटर
₹2200 मध्ये – शिलाई मशीन
₹1200 भरल्यास – विधवा महिलांना दरमहा ₹10,000 पेन्शन
विविध शासकीय योजनेच्या नावाखाली सायकल, लॅपटॉप, अन्नधान्य यांचे आश्वासन
हे सगळे आमिष दाखवून हजारो गरीब नागरिक व PRO मार्फत पैसे गोळा करून त्यांचा अपहार करण्यात आला. मात्र कोणत्याही योजना प्रत्यक्षात दिल्या गेल्या नाहीत.
◆ आर्थिक गुन्हे शाखेची कसून चौकशी
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, नांदेड करीत असून, आतापर्यंत 13 आरोपी ओळखले गेले आहेत. यापैकी:
4 आरोपी अटकेत
6 आरोपी अटकपूर्व जामिनावर
1 आरोपी मयत
2 आरोपी – बाबासाहेब सुतारे व साथीदार – नुकतेच अटकेत
मुख्य आरोपी बाबासाहेब सुतारे व त्याची साथीदार सोनाली विजयराव बाजड हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून फरार होते. ते लातूरमध्ये “सतीश” नावाने लपून राहत होते. श्री. मिलिंद सोनकांबळे, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने त्यांना लातूरमधून अटक केली.
मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, आणखी काही फसवणूकग्रस्त नागरिक पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही घटना सर्वसामान्य नागरिकांनी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी शासनाची अधिकृत खात्री करूनच पुढील पाऊल टाकावे, असा महत्त्वाचा इशारा देणारी आहे.
विशेष सूचना: या गुन्ह्यात जर तुमचाही सहभाग आहे किंवा माहिती हवी असल्यास, कृपया नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.



