प्रभाकर पेटकर यांची भाजप राज्य परिषदेच्या प्रदेश सदस्यपदी निवड
पक्षनिष्ठेचा सन्मान, संघटन बांधणीसाठी अनुभवी नेतृत्वाला प्राधान्य..

भाजपच्या संघटन विस्तार आणि बळकटीकरणाच्या धोरणांतर्गत महाराष्ट्र भाजप राज्य परिषदेवर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, नांदेड महानगर भाजपचे उपाध्यक्ष आणि पक्षाचे जुने, ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते प्रभाकर पेटकर यांची राज्य परिषदेच्या प्रदेश सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
जनसंघापासून सुरू झालेला त्यांचा पन्नास वर्षांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास, त्यातील कार्यनिष्ठा आणि संघटनशीलता यामुळे त्यांची ही निवड अत्यंत योग्य आणि प्रतीकात्मक ठरत आहे.
या निवडीची अधिकृत घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी नियुक्तीपत्राद्वारे केली असून, पेटकर यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
दीर्घकाळापासून पक्षात कार्यरत असलेल्या आणि कार्यकर्त्यांच्या भावनांशी समरस असलेल्या प्रभाकर पेटकर यांनी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी नेहमीच आघाडी घेतली आहे. पक्षासाठी सातत्याने काम करत राहणाऱ्या या निष्ठावंत कार्यकर्त्याला राज्यस्तरावर स्थान मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना पेटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे तसेच नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. पक्षाने सोपवलेली जबाबदारी ते पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यात आगामी महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य परिषदेची पुनर्बाधणी करण्यात आली आहे.
या निवडणुकांत भाजपचे स्थानिक पातळीवरील बळ वाढवणे, कार्यकर्त्यांचे प्रभावी नेटवर्क उभे करणे आणि संघटनात्मक ताकद दाखवणे हे पेटकर यांच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे.
त्यांच्या अनुभवी नेतृत्वाचा लाभ नांदेड जिल्ह्यातील भाजपच्या आगामी वाटचालीत निश्चितच दिसून येईल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.



