महाराष्ट्रा

वजिराबाद पोलिसांची माणुसकीची कामगिरी! मनोरुग्ण महिलेला तिचा पती व दोन मुलींची भेट घडवून आणत दिलासा

 

नांदेड | प्रतिनिधी – राखी पौर्णिमेच्या दिवशी नांदेड शहरात एक हृदयस्पर्शी घटना समोर आली, ज्यात वजिराबाद पोलीस स्टेशन व श्रद्धा NGO यांच्या संयुक्त प्रयत्नातून एका मनोरुग्ण महिलेला तिचे पती आणि दोन चिमुरड्या मुलींशी पुन्हा एकत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.

घटनेचा तपशील:
19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी चक्रधर खानसोळ यांनी वजिराबाद पोलिसांना कळवले की डॉक्टर उमरेकर हॉस्पिटल समोर एक 25-30 वर्षांची महिला जोरजोरात आरडाओरडा करत असून, तिच्या जवळील 6-7 महिन्यांच्या बाळावर मारहाण करत आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर महिलेला ताब्यात घेतले. तिचे वर्तन वेडेवाकडे असल्याने आणि नाव-गाव काही सांगत नसल्याने, तिची वैद्यकीय तपासणी करून बाळाला बालकल्याण समितीच्या आदेशाने सावित्रीबाई फुले शिशुगृह लोहा येथे दाखल करण्यात आले.

महिलेला सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर 10 सप्टेंबर 2024 रोजी न्यायालयाच्या आदेशाने तिचे प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवाडा पुणे येथे हलवण्यात आले, जेथे तिच्यावर 11 महिने उपचार करण्यात आले.

नातेवाईकांचा शोध आणि पुन्हा एकत्र येणे:
दरम्यान, वजिराबाद पोलिसांनी अथक परिश्रम घेत महिलेचे नाव मंटादेवी बिरबल महंतो असून ती चंपारण, बिहार येथील रहिवासी असल्याचे शोधून काढले. नंतर तिच्या पतीशी संपर्क साधून त्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आले. महिलेची प्रकृती सुधारल्यावर तिला पतीसह नांदेडला आणले गेले.

महिलेच्या जवळील बाळाला पुन्हा ताब्यात देण्यात आले. तसेच, तिने तिची तीन वर्षांची दुसरी मुलगी तिच्यासोबत होती असे सांगितले. चौकशीत ती मुलगी रेल्वे स्टेशन परिसरात सापडली होती आणि गितानगर येथील शिशुगृहात ठेवण्यात आली होती. खात्री पटल्यानंतर तिचाही पालकांकडे हस्तांतर करण्यात आले.

कौतुकास्पद कामगिरी
10 जुलै 2025 रोजी संपूर्ण कुटुंब नांदेडहून बिहारसाठी रवाना झाले. वजिराबाद पोलीस व श्रद्धा NGO यांच्या या माणुसकीच्या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी तोंड भरून कौतुक केले.

ही घटना केवळ पोलिसांच्या दक्षतेची नव्हे तर संवेदनशीलतेची आणि मानवतेची साक्ष देणारी ठरली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *