सेल्स प्रमोशन कर्मचाऱ्यांच्या सेवा हक्कांच्या संरक्षणाची मागणी

पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज् असोसिएशन (MSMRA) यांच्या वतीने सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज (कंडिशन्स ऑफ सर्व्हिस) कायदा, 1976 च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मेडिकल व सेल्स प्रमोशन कर्मचाऱ्यांच्या सेवा हक्कांचे संरक्षण, नोकरीची सुरक्षितता आणि कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.
कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या माहिती फलकावर सेल्स प्रमोशन कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या विविध कामगार कायद्यांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये कामगार नुकसानभरपाई कायदा, औद्योगिक विवाद कायदा, किमान वेतन कायदा, बोनस कायदा, ग्रॅच्युइटी कायदा तसेच मातृत्व लाभ कायदा यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले.
यावेळी सेल्स प्रमोशन कर्मचाऱ्यांचे कायदेशीर हक्क अबाधित ठेवणे, त्यांच्या सेवा अटींचे संरक्षण करणे आणि नव्या श्रम संहितेतील कामगारविरोधी तरतुदींना विरोध करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच या संदर्भात अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने आखलेल्या आंदोलनात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प करण्यात आला.
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज् यांच्या सेवा अटींचे संरक्षण व्हावे आणि संबंधित कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
या कार्यक्रमात फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हज् असोसिएशन्स ऑफ इंडियाचे सहमहासचिव कॉ. कृष्णकांत कदम, महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज् असोसिएशनचे अध्यक्ष कॉ. नरेंद्र सिंग, महासचिव कॉ. श्रीकांत फोपसे आणि सहमहासचिव कॉ. रितेश शहा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.



