भारतीय स्टेट बँकेतील वरिष्ठ प्रधान संदेशवाहक सय्यद सलीम यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न – ३३ वर्षांची निष्ठावान सेवा संपन्न

नांदेड, दि. ३१ जुलै (प्रतिनिधी): भारतीय स्टेट बँक, मुद्रा प्रशासन कक्ष शाखा, शिवाजीनगर, नांदेड येथे कार्यरत असलेले वरिष्ठ प्रधान संदेशवाहक सय्यद सलीम यांनी आपल्या बँकिंग सेवेला ३३ वर्षे निष्ठेने वाहून आता नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या गौरवशाली सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन ३१ जुलै रोजी शाखा स्तरावर अत्यंत उत्साही वातावरणात व भावनिक वातावरणात पार पडले.
सय्यद सलीम, जे सर्वांच्या ओळखीचे ‘सलीम भाई म्हणून परिचित आहेत, यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणा, संयम, शिस्त व सेवाभाव या मूल्यांची प्रेरणादायी सांगड घातली. त्यांनी बँकेच्या विविध कामकाजात योगदान देताना नेहमीच सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि आपली सेवा कधीही मर्यादित स्वरूपात न ठेवता तिचे व्यापक रूप समाजापर्यंत पोहोचवले.
समारंभात शाखेचे व्यवस्थापक व सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सय्यद सलीम यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवले. यावेळी अनेक सहकाऱ्यांनी आपले अनुभव शेअर करत त्यांच्या शांत, सौम्य आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावाचे मनःपूर्वक कौतुक केले.
“सलीम भाई यांच्यासारखी कर्मनिष्ठ माणसं ही कोणत्याही संस्थेची खरी संपत्ती असते. त्यांनी आपले काम केवळ एक जबाबदारी म्हणून नाही, तर एक सेवा म्हणून पार पाडले,” असे उद्गार शाखा प्रमुखांनी काढले.
समारंभाच्या अखेरीस सय्यद सलीम यांनी आपल्या भावना व्यक्त करत, बँकेतील सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे आभार मानले. “ही बँक म्हणजे माझं दुसरं कुटुंब आहे. या प्रवासात मला प्रेम, सन्मान आणि आपुलकी लाभली. या आठवणी कायमस्वरूपी हृदयात राहतील,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सायली देशमुख यांनी केले तर उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पुढील जीवनप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सलीम भाई… आपल्या पुढील आयुष्यात आरोग्य, आनंद व शांतता लाभो, हीच सर्वांची सदिच्छा.



