मिल्लत नगर परिसरात स्वच्छतेचा अभाव; सामाजिक कार्यकर्त्यांकडून आमदारांकडे निवेदन

नांदेड– पावसामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर नांदेड उत्तर मतदारसंघातील मिल्लत नगर व आजूबाजूच्या परिसरात तात्काळ स्वच्छता उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख अब्दुल वहिद यांनी आमदार श्री. बालाजीराव कल्याणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात साचलेले पाणी, रस्त्यावर पडलेले कचऱ्याचे ढीग, मोठमोठे खड्डे, कार्यरत नसलेली स्ट्रीट लाईट्स आणि नाल्यांतील डासांवर नियंत्रणासाठी औषध फवारणीचा अभाव या समस्यांमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात डेंग्यू, चिकनगुनिया, टायफॉईड यांसारख्या साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
* नाल्यांची तात्काळ आणि नियमित साफसफाई करण्यात यावी.
* रस्त्यावर साचलेला कचरा त्वरित हटवण्यात यावा.
* खड्डे बुजवून रस्त्यांची डागडुजी करावी.
* स्ट्रीट लाईट कार्यान्वित करण्यात याव्यात.
* डास नियंत्रणासाठी नियमित औषध फवारणी करण्यात यावी.
* नळाद्वारे येणारे पाणी शुद्ध करण्यात यावे.
मोहम्मद अमजद साहब, शेख शोएब, मौलाना रिझवान (मस्जिद-ए-अब्बासी) व शेख अब्दुल वहिद यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.



