रस्त्याच्या कामासाठी आम्ही २०२४ पासून पाठपुरावा केला; आता फुकटचे श्रेय घेऊ नका – रऊफ जमीनदार

नांदेड (प्रतिनिधी) : शहरातील मालटेकडी ब्रिजवरील रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रऊफ जमीनदार यांनी २०२४ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून, २० सप्टेंबरपासून मालटेकडी ब्रिजवरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.
मालटेकडी ब्रिजवरील रस्ता खड्डेमय झाल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोकाही निर्माण झाला होता. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी रऊफ जमीनदार यांनी प्रशासनाकडे लावून धरली होती.
या मागणीसाठी जमीनदार यांनी २०२४ मध्ये तसेच १५ ऑक्टोबर २०२५ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदने दिली होती. या पाठपुराव्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सदर रस्त्याच्या कामाला तांत्रिक मान्यता दिली. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
देगलूर नाका परिसरातील रस्ते, नाल्या आणि इतर नागरी समस्यांबाबतही रऊफ जमीनदार यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. काही प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलनेही केली आहेत. मालटेकडी ब्रिजवरील रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, रस्त्याचे काम सुरू होताच काही नेते या कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत असल्याचा आरोप रऊफ जमीनदार यांनी केला आहे.
“मालटेकडी ब्रिजवरील रस्त्याच्या कामासाठी आम्ही २०२४ पासून पाठपुरावा करत आहोत. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन आता प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. मात्र, आता काही मंडळी कामाचे श्रेय घेण्यासाठी फोटोसेशन करत फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे रऊफ जमीनदार यांनी स्पष्ट केले.



