लोह्यात मुसळधार पावसाने हाहाकार-भिमानदीच्या पुरामुळे मोठे नुकसान

लोहा – तालुक्यातील लोहा शहर व परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भिमानदी नदीने रोद्र रूप धारण केले. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक नागरिकांच्या दुचाकी, ऑटो व पाण्याच्या सिनटेक्स टाक्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पूरग्रस्त भागाची माहिती मिळताच आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. या पाहणीदरम्यान माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, छत्रपती दादा धुतमल, माजी नगरसेवक करीम शेख, भास्कर पाटील पवार, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, बी. डी. जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. छायाचित्र – विनोद महाबळे



