औरंगाबाद पोलिसांची नांदेड मध्ये धडक कारवाई देगलूर नाका येथे नशेच्या गोळ्यांची विक्री करणारे दोघे जेरबंद

औरंगाबाद : तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणाऱ्यांवर औरंगाबाद पोलिसांनी धडक कारवाई करत नांदेड जिल्ह्यातील देगलूर नाका परिसरातून दोन जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून लाखो रुपयांच्या नशेच्या गोळ्या व इंजेक्शन्स जप्त करण्यात आले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर नाका परिसरातील एका हेल्थ क्लबमधून या गोळ्या आणि इंजेक्शन्सची अवैध विक्री केली जात असल्याचा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर छापा टाकून दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आले.
अटक करण्यात आलेले दोघेही नांदेड येथील इक़बाल नगर भागातील रहिवासी आहेत. फिटनेस व बॉडीबिल्डिंगच्या नावाखाली हे लोक तरुणांना पावडर, गोळ्या आणि इंजेक्शन्स देऊन व्यसनाधीन बनवत होते. यामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
फिटनेसच्या नावाखाली सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे युवकांचे आरोग्य धोक्यात येत असून, समाजात एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही जिममध्ये असे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, जिम मालकांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. समाजातील तरुण पिढीला वाचवण्यासाठी अशा अवैध व्यवसायाविरुद्ध कडक पावले उचलण्याची गरज आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.



