नांदेड शहरात जश्ने ईद मिलाद उन नबीची भव्य मिरवणूक उत्साहात पार

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात सोमवारी जश्ने ईद मिलाद उन नबीच्या निमित्ताने ऐतिहासिक आणि भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीचे आयोजन मिलाद कमिटी तर्फे करण्यात आले होते.
ही मिरवणूक सकाळी १० वाजता निजाम कॉलनी येथून सुरू झाली. श्रीनगर, आयटीआय, शिवाजी नगर, कला मंदिर, वजिराबाद, शिवाजी पुतळा, गांधी पुतळा, महावीर चौक, गुरुद्वारा चौक, जुना मोंढा, हबीब टॉकीज मार्गे ने ही मिरवणूक पुढे सरकत दुपारी २ वाजता मोहम्मद अली रोड येथे संपन्न झाली.
मिरवणुकीदरम्यान हजारो मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने सहभागी झाले. शहरभर “या नबी सलाम अलेक” आणि इतर धार्मिक घोषणा देत वातावरण भक्तिमय करण्यात आले. अनेक ठिकाणी नात-शरीफ पठण, बॅंड, झंडे -पथक, तांड्या, तसेच मुलांचे आकर्षक वेशभूषेत सादरीकरण पाहायला मिळाले.
शहरातील विविध भागात उभारलेल्या स्वागत मंडपांमधून सहभागींचे स्वागत फुलांच्या वर्षावाने व शीतपेय, प्रसाद वितरण करून करण्यात आले. लहान मुले व युवक वर्गाचा विशेष सहभाग या मिरवणुकीत पाहायला मिळाला.
मिरवणूक शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. महत्त्वाच्या चौकांवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
या भव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात प्रकाश सजावट व गेट्स लावून विशेष स्वागत करण्यात आले.



